अजित पवार यांच्याबरोबर बंद दाराआड पिंपरीतील ‘एका’ आमदाराची अर्धातास चर्चा

0
734

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. महापालिकेतील भाजपाची सत्ता खेचून घ्यायची असा चंग राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला आहे. भाजपाचे तब्बल २२ आजी-माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपा नगरसेविका चंदा लोखंडे आणि माया बारणे यांचे पती व माजी नगरसेवक अनुक्रमे राजू रामा लोखंडे आणि संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, भाजपाच्या एका आमदाराने अजित पवार यांच्या बरोबर बंद दाराआड अर्धा तास चर्चा केल्याचे वृत्त हाती आल्याने भाजपा आणि राष्ट्रवादीच्या गोटातही खळबळ उडाली आहे.

महापालिकेतील भाजपामध्ये नाराज नगरसेवकांचा एक मोठा गट टप्याटप्याने राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार आहे. दिवंगत भाजपा नेते अंकुश लांडगे यांचे लांडगे घराणे हे भाजपाशी तीन पिढ्यांपासून एकनिष्ठ समजले जाते. नगरसेवक रवि लांडगे यांना एकही महत्वाचे पद मिळाले नाही म्हणून उघडपणे बंड पुकारले असून ते लवकरच अजित पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार आहेत. भोसरी विधानसभेतील दुसरे ताकदिचे नगरसेवक संजय नेवाळे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेशाचे सुतोवाच केले आहे. भोसरीतीलच २० नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे दुसरी मोठी बातमी असल्याने आमदार लांडगे यांच्या वर्तुळातही खळबळ आहे. भाजपाला मोठे भगदाड पडणार असल्याच्या जोरदार हालचाली सद्या सुरू असून त्याची सुरवात झाली आहे. गणेशोत्सव ते दिपावली अशा आगामी दोन महिन्यांत हे प्रवेश होतील. निवडूण येण्याची क्षमता असणाऱ्या नगरसेवकांनाच पुन्हा राष्ट्रवादीतून संधी देण्याचे पवार यांचे धोरण असून प्रवेश देताना तो पहिला निकष आहे. भाजपाने राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवक, पदाधिकारी फोडून २०१७ मध्ये सत्ता खेचून घेतली होती. त्यांना पाच वर्षांत पदे न मिळाल्याने नाराजीचा सूर आहे.

शहरातील भाजपाचे दोन आमदार (महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप) असून त्यांच्या गटबीलाही नगरसेवक कंटाळले आहेत. दरम्यानच्या काळात एक आमदार गेल्या शुक्रवारी विविध कामांचे निमित्त करून अजित पवार यांना भेटले. दोघांमध्ये बंद दाराआड खूप गंभीर चर्चा झाली. यावेळी बाहेर उपस्थित राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुळबूळ सुरू होती. शहर भाजपामध्ये हे वृत्त धडकताच तिथेही चर्चेला उधाण आले असून भाजपा नगरसेवकांबरोबर पदाधिकाऱ्यांमध्य संभ्रम निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या भेटीत सबंधीत मदार महोदयांबरोबर काय चर्चा झाली याबाबत खुद्द राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनाही उत्कंठा लागून राहिली आहे. विकास कामांबरोबरच काही खासगी विषय आणि राजकीय मुद्यांवरही उहापोह झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी काळात पिंपरी चिंचवड शहरात भाजपाला मोठा धक्का देण्याची राष्ट्रवादीने तयारी केली आहे, असेही सांगण्यात आले.