कुंभमेळ्यामुळे कोरोना देशभर पसरला, असे खोटे पसरवून साधूसंतांवर लांच्छन लावणे, हे महापापच !* – स्वामी गोविंददेवगिरीजी

0
283

पुणे, दि. २७ (पीसीबी) – कुंभमेळ्यामुळे देशभरात कोरोना पसरला’, असा अपप्रचार करण्यासाठी ‘टूलकीट’चा वापर हा भारताला अस्थिर करण्यासाठी केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यावर कुंभमेळा शेष असतांनाही साधूसंतांनी कुंभचे समापन केले. हरिद्वारातील अनेक मठ, रस्ते सर्वकाही रिकामे झाले होते. यासाठी खरे साधू-संतांचे अभिनंदन करायला हवे होते. त्याऐवजी ‘त्यांनी देशभर कोरोना पसरवला’ असे लांच्छान लावणे, हे महापाप आहे. भारताचे दुर्दैव आहे की, देशातील अनेक प्रसिद्धीमाध्यमे, लेखक हे विदेशी शक्तींकडे विकले गेलेले आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृती, आस्था, धर्म, परंपरा यांवर हल्ला करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. राजकीय स्वार्थासाठी खोटे प्रसारित करणे, हे त्यांना शोभत नाही. भारतीय जनतेने अशा अपप्रचाराचा सनदशीर मार्गाने तीव्र विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या’चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी केले. ते ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘कुंभमेळ्याच्या अपकीर्तीचे राजकीय षड्यंत्र’, या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर 4179 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.

या वेळी राष्ट्र आणि धर्म यांवर कार्यक्रम घेणार्‍या ‘जम्बो टॉक’ या यू-ट्यूब वाहिनीचे संचालक श्री. निधीश गोयल म्हणाले की, भारतात ‘टूलकीट’चा वापर फार पूर्वीपासून लोकांमध्ये घृणा, वैमन्स्य पसरवण्यासाठी केला जात आहे. प्रथम ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘टाइम’, ‘अल-जझिरा’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी कुंभमेळ्याविषयी अपप्रचार करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर भारतातील त्यांच्या हस्तकांनी अपप्रचार चालू केला. निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसक आक्रमणे झाल्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला नाही; मात्र ‘टूलकीट’प्रकरणी ट्वीटरच्या दिल्ली कार्यालयावर पोलिसांनी कारवाई केल्यावर लगेच काँग्रेसने आक्षेप घेतला, हे समजून घेतले पाहिजे.

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, तबलीगी मर्कजची तुलना कुंभमेळ्याशी करणे चुकीचे आहे; कारण तबलीगीवाल्यांनी अनुमती न घेता कार्यक्रम केला. पोलीस आल्यावर तबलीगी पळाले, अनेक तबलीगींनी कोरोना असल्याचे लपवले. कोरोनाग्रस्त तबलीगींनी नर्सेस् आणि डॉक्टर यांच्याशी असभ्य वर्तन केले. या उलट कुंभमेळ्याला येणार्‍या प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. अनेक मठ-आश्रमांत कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र प्रवेशासाठी बंधनकारक असल्याचे फलक लावलेले होते. त्यामुळे कुंभमेळ्यामुळे देशभर कोरोनाचा पसरल्याचा खोटा प्रचार करणार्‍या काँग्रेसने देशाची क्षमायाचना केली पाहिजे. या वेळी सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. राजेंद्र वर्मा म्हणाले की, कुंभमेळ्यासारख्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई करता येते. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन स्वत:तील मतभेद प्रथम दूर केले पाहिजे. त्यामुळे विरोधी शक्तींचा पराभव निश्‍चित होईल.