किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

0
248

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – नळावर लहान मुलाने पाणी उडविले, त्याबाबत महिलेने लहान मुलाला विचारणा करून घरी जाण्यास सांगितले. त्या कारणावरून सहा जणांनी महिलेला हाताने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी रमाबाईनगर, पिंपरी येथे घडली.

रेखा सुरज चंदनशिवे (वय 33, रा. रमाबाई नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीकांत ईश्वर सोनवणे (वय 45) आणि त्याच्या घरातील पाच नातेवाईक महिला (सर्व रा. रमाबाईनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी रेखा या त्यांच्या राहत्या घरासमोर सार्वजनिक नळावर कपडे धूत होत्या. त्यावेळी पाठीमागील गल्लीतील नऊ वर्षीय लहान मुलगा पाण्यामध्ये खेळत होता. यावेळी नळाचे पाणी त्याने उडवले. यामुळे फिर्यादी रेखा यांनी मुलाला ‘घरी जा’ असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून एकत्र येऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी दोन महिला आरोपींपैकी एकीने लोखंडी रॉड आणि दुसरीने मारण्यासाठी वीट उगारली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.