“काँग्रेसने शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेलं”

0
338

मुंबई,दि.५(पीसीबी) – भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी “काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेत आहे. शिवसेनेच्या बदल्यात मनसेला जागा करुन दिली जात आहे” असा आरोप केला आहे. हिंदुत्त्व सोडलं नसेल तर शिवेसेनेने राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) समर्थन द्यावं असं आव्हान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

“काँग्रेसने योग्य प्लॅन करुन शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेलं. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. काँग्रेस तुम्हाला हिंदुत्वापासून दूर नेत आहे. त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्त्ववादी म्हणून मनसे आणि भाजपा येत आहे याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून गलिच्छ आरोप झाले तेव्हा शिवसेना शांत का बसली होती ? अशी विचारणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. काँग्रेस सेवा दलाच्या निवासी शिबिरात वाटलेल्या पुस्तिकेत नथुराम गोडसे आणि सावरकर यांच्यात शारीरिक संबंध असल्याचा खळबळजनक उल्लेख करण्यात आला होता. त्याच पार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील यांनी ही विचारणा केली.

दरम्यान, राज्य सरकारकडून योजना रद्द केल्या जात असल्याच्या निर्णयावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी सरकारने जुनं रद्द करण्यास काही हरकत नाही पण त्याला पर्याय दिला पाहिजे असं मत व्यक्त केलं. “वर्षभर चौकशी करुन योजना प्रलंबित ठेवल्या जाऊ नयेत. घोटाळा झाला असेल तर चौकशी करुन कारवाई करा आणि काम सुरु करा,” असं त्यांनी सांगितलं.