काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमचा निषेध

0
201

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. प्राथमिक फेऱ्यांचे कल पाहाता भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. गोव्यात देखील भाजपानं दमदार वाटचाल केली असताना काँग्रेससाठी मात्र प्रत्येक फेरीनंतर हा पेपर कठीण होत चालला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे गोवा आणि उत्तर प्रदेशात देखील काँग्रेस पिछाडीवर असताना दिल्लीत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमचा निषेध करण्यात येत आहे.

दिल्लीमध्ये काँग्रेसच्या पक्ष मुख्यालयाच्या बाहेर काही कार्यकर्त्यांनी ईव्हीएमचा निषेध करणारे फलक हाती घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहुल प्रियंका गांधी सेना असं या फलकांवर लिहिलेलं असून त्याखाली इव्हीएमचा निषेध करणारा संदेश लिहिला आहे. “ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्या होत आहे”, असं या फलकांवर लिहिलेलं आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेसची पीछेहाट होत असताना दुसरीकडे पक्षानं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये गेल्या महिन्याभरात सात टप्प्यांमध्ये मतदान झालं आहे. आज या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी होत आहे. २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम या पाच राज्यांमधल्या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी आजच्या निकालांनंतर २०२४च्या निवडणुकांसाठी पेपर अधिक कठीण झाल्याचं दिसू लागलं