कर्णधार अजिंक्य रहाणेने संयम ढळू न देता निर्णायक शतक झळकविले

0
227

मेलबर्न, दि.२७ (पीसीबी) : दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांच्या संयमाची परीक्षेचा होता. अशावेळी इतर फलंदाजांचा संयम ठराविक अंतराने ढळत असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने आपला संयम ढळू दिला नाही आणि निर्णायक शतक झळकविले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने ५ बाद २७७ धावा करून ८२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. आणखी तीन दिवसांचा खेळ शिल्लक असून आघाडी दोनशे धावांच्या पलीकडे गेल्यास भारताला विजयाची संधी निर्माण होऊ शकते. पावसाने दोनदा व्यत्यय आणला असला तरी त्यामुळे खेळ वाया जाईल, अशी शक्यता कमी आहे.रहाणेच्या शतकात आज फटकेबाजीचा समावेश नव्हता, फार नजाकत नव्हती, तरीही हे शतक त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम शतकांपैकी एक मानले जाईल. कारण मालिकेचा आणि या सामन्याचा एकूण विचार केल्यास भारतासाठी परिस्थिती फार कठीण होती. त्यात सकाळी शुभमन गिल आणि भक्कम बचावासाठी ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा बाद झाल्याने संकटात आणखी भर पडली होती. अशा वेळी खेळपट्टीवर टिकून राहणे गरजेचे होते. सुरुवातीला बचाव करताना बराच संघर्ष करावा लागला. मात्र, मुंबईचे फलंदाज ज्या खडूसपणाबद्दल ओळखले जातात, तो खडूसपणा रहाणेने मेलबर्नमध्ये दाखविला. त्यामुळे भारताची स्थिती मजबूत झाली. त्यातच कर्णधारपदाची धुरा सांभाळत असल्याने या शतकाला वेगळी सोनेरी किनार लाभली.

कसोटीचा विचार केला तर मेलबर्न मैदानासोबत भारतीय क्रिकेटपटूंच्या अनेक गोड आठवणी आहेत. त्यापैकी बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडत आहे. असे म्हटल्या जाते की येथे कुणीही एका भारतीय फलंदाजाने शतक झळकविले किंवा गोलंदाजाने पाच गडी बाद केले तर भारताचा विजय निश्चित असतो. रहाणेच्या शतकामुळे एक बाजू पूर्ण झाली आहे. दोन जीवदानाचा हातभार असला तरी या मैदानावरील हे त्याचे दुसरे कसोटी शतक होय. अशी कामगिरी यापूर्वी फक्त विनू मांकड यांना करता आली आहे. तसेच ८७ वा कसोटी सामना खेळणाऱ्या रहाणेचे हे बारावे शतक होय. रहाणेने शतक झळकविताना दोन अर्धशतकी आणि एक शतकी भागीदारी केली. प्रथम त्याने हनुमा विहारी व त्यानंतर ऋषभ पंतसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पंत बाद झाल्यावर जडेजा आणि रहाणे जोडी चांगलीच जमली. दोघांनी नाबाद १०४ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या संयमाची परीक्षा पाहली.

सकाळी खेळ सुरू झाला त्यावेळी पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल व चेतेश्वर पुजाराकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, वेगवान धावा काढण्याचा नाद गिलला अडला आणि तो ..गोलंदाजीवर बाद झाला. पुजारा त्याबाबतीत कमनशिबी ठरला. कारण कमिन्सच्या एका अप्रतिम चेंडूवर यष्टीरक्षक टिम पेनने तेवढाच जबरदस्त झेल घेतला. हे दोघे बाद झाल्यावर हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणेने संथ गतीने धावफलक हलता ठेवला. दोघांनी ५२ धावांची भागीदारी केली. त्यावेळी असे वाटले की ही भागीदारी आणखी वाढेल. मात्र, नाथन लायनला खेळताना अडचण येत असल्याने विहारीने स्वीपचे तंत्र वापरण्याचा निर्णय घेतला. त्यात एकदा त्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर त्याने कट मारून चौकार खेचला. येथे विहारीचा संयम ढळला आणि लायनने ही बाब अचूक हेरली आणि स्वीप मारण्यासाठी त्याला आमंत्रण देत चेंडू टाकला. त्यात विहारी अडकला. बाद होण्यापूर्वी विहारीने रहाणेसोबत ५२ धावांची भागीदारी केली. विहारी बाद झाल्यावर पंत खेळपट्टीवर आला. त्यानंतर भारताचा धावांचा वेग वाढला. पुन्हा पंत आणि रहाणे जोडी स्थिरावली असे वाटत असतानाच पंतला स्टार्कच्या गोलंदाजीवर फटका मारण्याचा मोह रोखता आला नाही आणि तो यष्टीमागे झेल देऊन बाद झाला. मात्र, त्याने रहाणेसोबत ५७ धावांची भागीदारी करून भारताला अडचणीतून बाहेर काढण्यात मोलाचा हातभार लावला.

भारत पहिला डाव ः मयांक अगरवाल पायचीत गो. स्टार्क ०, शुभमन गिल झे. पेन गो. कमिन्स ४५, चेतेश्वर पुजारा झे. पेन गो. कमिन्स १७, हनुमा विहारी झे. स्मिथ गो. लायन २१, अजिंक्य रहाणे खेळत आहे १०४ (२०० चेंडू, १२ चौकार), ऋषभ पंत झे. पेन गो. स्टार्क २९, रवींद्र जडेजा खेळत आहे ४०, अवार २१, एकूण ९१.३ षटकात ५ बाद २७७ बाद क्रम ः १-०, २-६१, ३-६४, ४-११६, ५-१७३गोलंदाजी ः स्टार्क १८.३-३-६१-२, कमिन्स २२-७-७१-२, हॅझेलवुड २१-६-४४-०, लायन १८-२-५२-१, ग्रीन १२-१-३१-०

रवींद्र जडेजा तसा आक्रमक फलंदाज. मात्र, खेळपट्टीवर आल्यानंतर संघाची गरज ओळखून त्याने खेळ केला आणि रहाणेला मोलाची साथ दिली. तेच योगदान भारताला आघाडी घेण्यास फायदेशीर ठरले. तो ४० धावांवर नाबाद असला तरी त्यासाठी त्याने १०४ चेंडू खेळून काढले आणि फक्त एक चौकार मारला. दोघांनी १०४ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. काही षटकांचा खेळ शिल्लक असताना पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबविण्यात आला. त्यावेळी भारताने ५ बाद २७७ अशी मजल मारली होती.