‘शत्रुच्या मुलखात त्याला पराभूत करणे हेच खरे शौर्य आणि ते प्रभू रामचंद्रांनी केले’ – चारूदत्त आफळे

0
585

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – राष्ट्रधर्म म्हणजे केवळ सीमेचे संरक्षण एवढीच व्याख्या नव्हे, तर जे जे आहे ते ते वाचवणे, यालाही राष्ट्रधर्म म्हणतात. इतिहासाचा विषय राष्ट्राचा असतो म्हणून इतिहास राष्ट्र घडवितो. शत्रूला त्याच्या राजधानीत जाऊन पराभूत करणे हे खरो शौर्य आहे आणि असेच शौर्य प्रभू रामचंद्रांनी केले होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारूदत्त आफळे यांनी केले.

अमोल थोरात फाऊंडेशनच्या वतीने चिंचवडगाव येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त “राष्ट्रस्वाभिमान श्रीराम मंदिर निर्माण” या विषयावर आयोजित प्रबोधनपर व्याख्यानात हभप चारूदत्त आफळे बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा उज्वला गावडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, योगी महासभेचे आंतरराष्ट्रीय प्रचार प्रसार अध्यक्ष महंत डॉ. योगी विलासनाथ महाराज, राममंदिर निर्माण पश्चिम महाराष्ट्र निधी संकलन प्रमुख मलिंदराव देशपांडे, आरएसएसचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव थोरात, धर्मजागरण पश्चिम महाराष्ट्र प्रमुख हेमंत हरहरे आदी उपस्थित होते.

चारूदत्त आफळे म्हणाले, “समर्थ रामदास स्वामींना रामायणातील रामाचा पराक्रम आवडीचा होता. मात्र त्याच काळात इतर संत शांतीचा मार्ग सांगत होते. शांतीचा तो मार्ग चुकीच्या अर्थाने घेतला आणि घात झाला. तुकाराम महाराजांनी आपल्या ग्रंथात राम पराक्रमाचे कौतुकच केले आहेत, याचा विसर का पडतो. राष्ट्रधर्म म्हणजे केवळ सीमेचे संरक्षण एवढीच व्याख्या नव्हे, तर जे जे आहे ते ते वाचवणे, यालाही राष्ट्रधर्म म्हणतात. इतिहासाचा विषय राष्ट्राचा असतो म्हणून इतिहास राष्ट्र घडवितो. शत्रूला त्याच्या राजधानीत जाऊन पराभूत करणे हे खरो शौर्य आहे आणि असेच शौर्य प्रभू रामचंद्रांनी केले होते.

रावणाने स्वतः कोणतेच अत्याचार केले नाही, असा गवगवा केला जातो. मात्र अत्याचार करणाऱ्यांचा तो म्होरक्या होता, हे का विसरले जाते. त्याच्याच आदेशाने सर्व क्रूर खुरापत्या सुरू होत्या. सर्व ऋषीमुनींनी विष्णूयाग करून भगवान विष्णूला अवतार घेण्यास भाग पाडून व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली. ऋषीमुनींना युद्ध नकोच होते. मात्र आपल्याच कुळातला राक्षसी वृत्ती धारण करतो, तर त्याचा नायनाट करण्यासाठी युद्ध करणे भाग होते आणि म्हणूनच ते संपूर्ण सज्ज होते. ब्रिटिशांच्या नेतृत्वात लढणाऱ्या भारतीय सैन्याला १९४७ नंतर प्रथमच स्वतःच्या नेतृत्वात पाकिस्तानशी भिडावे लागले. त्यात विजय झाला त्याहीपेक्षा सैनिक आणि भारतीयांचे मनोबल उंचावण्यासाठी हे युद्ध महत्त्वाचे ठरले. वर्तमानातही साम-दाम-दंड भेद आखत युद्धसज्ज असावेच लागेल, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारूदत्त आफळे यांनी वाल्मिकी आणि रामायणाचा संदर्भ घेत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले. भाजपचे सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी आभार मानले.