कचराकुंडी खरेदीचा निर्णय रद्द करा; अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन – नाना काटे

0
606

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) –   महापालिकेच्या स्थायी समितीने ओला, सुका व घातक कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक घरासाठी तीन कचरा कुंडी देण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे.  हा निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा.  अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने  शहरात  याबाबत जनजागृती करुन जनतेसमवेत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी दिला आहे.  

याबाबत नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कचराकुंडी खरेदीसाठी  ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.  हा  उपक्रम स्वच्छ भारत अभियाना अंतर्गंत घेण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत ही खरेदी करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांसाठी कचराकुंडी पुरविणे हे काम मूळातच पालिकेचे नाही. तसेच शहरातील मध्यम वर्गींयापासून ते उच्चवर्गींयापर्यंतचे नागरिक हे डस्टबिन्स घेणार सुध्दा नाहीत. त्यामुळे या कचराकुंडीसाठी ३० कोटी रुपयांचा चुराडा का करण्यात येत आहे?

यात कोणाचे हित जोपासले जात आहे ?  ही सरळ सरळ करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टीच आहे. तसेच आता सध्या सुध्दा ओला, सुका व घातक कचरा ठेकेदार एकत्र करुनच नेत आहेत. मनपाकडे कचरा वर्गीकरणाची सक्षम यंत्रणा अद्यापही नाही. त्यामुळे हा योजनेचा मूळ उद्देशच साध्य होत नाही. त्यामुळे ही योजना राबविणे म्हणजे शहरातील नागरीकांच्या पैशाची नासाडी होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.