औरंगाबाद महापालिका निवडणूक तयारी जोमात, प्रभाग रचना जाहीर

0
210

औरंगाबाद, दि. २० (पीसीबी) – महापालिकेची रखडलेली निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. उद्या बुधवारी बहुसदस्यीय प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना असाधारण राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रभाग रचनेचा अंतिम नकाशा व प्रत्येक प्रभागाच्या हद्दी, व्याप्ती व वर्णन दर्शविणारे विवरणपत्र महापालिका मुख्यालयात व प्रभाग कार्यालयात तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख डॉ. संतोष टेंगळे यांनी सांगितले. दरम्यान, ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आता औरंगाबाद प्रमाणे राज्यातील अन्य महापालिकांच्या निवडणुकासुध्दा वेळेत होतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

कोरोना संसर्ग व सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली होती. हे दोन्ही अडथळे दूर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. १२६ वॉर्डाचे ४२ प्रभाग तयार करण्यात आले. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा व हद्दींचा नकाशा दोन जूनला प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर १६ जून पर्यंत हरकती-सूचना मागवण्यात आल्या.

२२ जूनला राज्य निवडणूक आयोगातर्फे नोंदणी महानिरीक्षक किरण हर्डीकर यांनी ३२४ आक्षेपावर सुनावणी घेतली. त्यानंतर काही सुधारणा करून हर्डीकर यांनी ३० जूनला प्रभाग रचनेचा अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या अंतिम अधिसूचनेस मंगळवारी मान्यता दिली. प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना बुधवारी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेचा अंतिम नकाशा व प्रत्येक प्रभागाच्या हद्दी, व्याप्ती व वर्ण दर्शविणारे विवरणपत्र (मराठी व इंग्रजी) नागरिकांच्या माहितीसाठी महापालिकेत सूचना फलकावर, प्रत्येक झोन कार्यालयात व अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.