औरंगजेबाबद्दल ‘त्या’ व्हायरल फेसबुक पोस्टवरून दगडफेक; ४ पोलीस जखमी

0
323

उस्मानाबाद, दि.२० (पीसीबी) : सोशल मीडिया म्हंटल तर एका क्लिकमध्ये कोणतीही माहिती जगभर पोहचते आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जातात. महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या औरंगजेबाविषयीच्या पोस्टवरून दोन गटात काल रात्री दगडफेक झाली. रात्री १० च्या सुमारास शहरातील विजय चौक येथे घडलेल्या या दगडफेकीच्या घटनेत विजय चौक येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेले ४ पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अंजुम शेख, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, शहर पोलीस निरिक्षक सुरेश बुधवंत, तहसिलदार गणेश माळी यांनी घटनास्थळी पोहचून तातडीने कारवाई केली. मुघल राजा औरंगजेबाविषयीच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर हा वाद उफाळला आहे.

प्रशासनाने बंदोबस्त लावत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलीस प्रशासन दोन्ही गटातील कायदा हातात घेणाऱ्यांवर कार्यवाही करत आहे. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केले आहे. शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत म्हणाले, “ही घटना फार विशेष नव्हती दोन तरुणांनी फेसबूकवर एक प्रतिक्रिया दिली होती. दुसऱ्या गटाने या प्रतिक्रियेमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. या फेसबुक प्रतिक्रियेवरून तक्रार आल्यानंतर आम्ही त्यावर कारवाई करणार आहे. मात्र, पोलीस कायदेशीर कारवाई करत असताना शांत राहणं गरजेचं होतं. विनाकारण चौकात येऊन हुल्लडबाजी करून, दगडफेक करून कायदा हातात घेतला आहे.”

“मी विजय चौकातील दोन्ही गटातील नागरिकांना आवाहन करतो की अफवांवर विश्वास ठेऊ नका. पोलीस पोलिसांचं काम करतील. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. फेसबुकवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊन वाद तयार करणारे आणि दगडफेक घेऊन कायदा हातात घेणाऱ्या दोन्हींवर कारवाई केली जाईल,” अशी माहिती पोलिसांनी दिली.