ओडिशाविरुद्ध पार्टालूच्या गोलमुळे बेंगळुरूची बरोबरी

0
315

फातोर्डा (गोवा), दि. 25 (पीसीबी) – हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात रविवारी दुसऱ्या सामन्यात माजी विजेत्या बेंगळुरू एफसीने ओडिशा एफसीला 1-1 असे बरोबरीत रोखले. आठ मिनिटे बाकी असताना एरीक पार्टालू याने केलेल्या गोलने बेंगळुरूला तारले.

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. आघाडी फळीतील ब्राझीलचा 29 वर्षीय खेळाडू दिएगो मॉरीसिओ याने आठव्याच मिनिटाला ओदिशाचे खाते उघडले. मध्यंतरास ओडिशाने ही आघाडी कायम राखली. आठ मिनिटे बाकी असताना मध्य फळीतील ऑस्ट्रेलियाचा 34 वर्षीय खेळाडू एरीक पार्टालू याने बेंगळुरूला बरोबरी साधून दिली.

बेंगळुरूने एका गुणासह नऊवरून दोन क्रमांक प्रगती करीत सातवे स्थान गाठले. त्यांनी जमशेदपूर एफसी आणि केरला ब्लास्टर्स या संघांना सरस गोलफरकावर मागे टाकले. तिन्ही संघांचे प्रत्येकी 14 गुण आहेत. यात बेंगळुरूचा गोलफरक उणे 2 (15-17), जमशेदपूरचा उणे 4 (13-17), तर ब्लास्टर्सचा उणे 5 (17-22) असा आहे.ओडिशाचे 11 संघांमधील अखेरचे स्थान कायम राहिले. 13 सामन्यांत त्यांना पाचवी बरोबरी पत्करावी लागली असून एक विजय व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे आठ गुण झाले. मुंबई सिटी एफसी 12 सामन्यांतून नऊ विजयांसह 29 गुणांनी आघाडीवर आहे. एटीके मोहन बागान दुसऱ्या क्रमांकावर असून 12 सामन्यांत सात विजयांसह 24 गुण अशी त्यांची कामगिरी आहे. एफसी गोवा तिसऱ्या क्रमांकावर असून 13 सामन्यांत पाच विजयांसह त्यांचे 20 गुण आहेत. हैदराबादचे चौथे स्थान आहे. 13 सामन्यांत त्यांचे 18 गुण आहेत.

ओडिशाने आक्रमक खेळ करीत खाते उघडण्याची शर्यत जिंकली. मध्य फळीतील जेरी माहमिंगथांगा याने फ्री किक घेत आघाडी फळीतील मॅन्युएल ओन्वू याच्या दिशेने चेंडू मारला ओन्वूने क्रॉस शॉटवर संदी निर्माण करताना मॉरीसिओने उजव्या पायने नेटच्या डाव्या कोपऱ्यात चेंडू मारला. त्यावेळी बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला कोणतीही संधी मिळाली नाही.

आठ मिनिटे बाकी असताना बेंगळुरूला आघाडी फळीतील सुनील छेत्रीमुळे कॉर्नर मिळाला. त्याने छोट्या फटक्यावर चेंडू मध्य फळीतील क्लेईटन सिल्वा याच्याकडे मारला. मग सिल्वाच्या अप्रतिम फटक्यावर पार्टालूने चेंडूला नेटची दिशा दिली. त्यावेळी ओदिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला चेंडू रोखण्यात अपयश आले. बेंगळुरूचा सात सामन्यांत सेट-पीसवरील हा चौथा गोल ठरला.