ऑनलाईन साईटवरून केक घेणं पडलं महागात; महिलेला 65 हजारांचा गंडा

0
222

वाकड, दि. १७ (पीसीबी) – ऑनलाईन साईटवरून केक घेणं महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. एका व्यक्तीने महिलेची बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन तिच्या बँक खात्यातून 65 हजार 191 रुपये काढून घेतले. तसेच महिलेच्या कागदपत्रांच्या आधारे बँक खाते सुरु केले. हा प्रकार वाकड येथे फेब्रुवारी महिन्यात घडला.

नम्रता नवीन चंद्र लड्डा (वय 30, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9305866958 या क्रमांकावरून बोलणारा देवेंद्र कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी डॅनिश केक शॉपमधून ऑनलाईन साईटवरून केक बुक केला. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना फोन करून रजिस्ट्रेशन करण्यास भाग पाडले. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून त्याने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 65 हजार 191 रुपये काढून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या कागदपत्रांचा वापर करून आरोपीने आयडीएफसी बँकेत ऑनलाईन खाते सुरु केले. त्यावर व्यवहार करून फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.