एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी; ३५३ खासदारांचा पाठिंबा

0
456

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान  मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने  पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवून  केंद्रातील सत्ता कायम ठेवली. आज ( शनिवारी) दिल्लीत ‘एनडीए’च्या  संसदीय दलाची बैठक झाली.  या बैठकीत पंतप्रधान मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) ३५३ खासदारांनी मोदींना पाठिंबा दिला आहे.

एनडीएतील ज्येष्ठ नेते, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांनी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जदयु नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान  व अन्य नेत्यांनी अनुमोदन दिले.  सर्व नवनिर्वाचित खासदारांनी हात उंचावून मोदी यांच्या नेतानिवडीला  हात उंचावून समर्थन केले. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा  देण्यात आल्या.

भाजप आणि घटक पक्षांचे खासदार  संसदीय दलाच्या  बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत एनडीएतील घटक पक्षांचेही खासदार उपस्थित होते. ‘एनडीए’च्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड करण्याच्या निर्णय घेण्यात आला. संसदीय नेतेपदी निवड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, एनडीएचे ३५३ खासदार निवडून आले असून यातून जनतेचा मोदींवरील विश्वास दिसून येतो. प्रचारादरम्यान अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले, पण आम्हाला आणि आमच्या मित्रपक्षांना विश्वास होता की आम्ही ५० टक्के जागांवर यशस्वी होऊ. देशाच्या मतदारांनी मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे, असे त्यांनी सांगितले.