थेरगांवातील केजुबाई धरणात लाखो मृत माशांचा खच

0
590

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – थेरगांव येथील  केजुबाई धरणात लाखो मृत मासे आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  पवना नदीवरील केजुबाई धरणात लाखो माशांचा मृत्यू कशामुळे झाला असावा, असा प्रश्न परिसरातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.   

पवना नदीपात्रात रसायनयुक्त आणि मानवी मैलाचे पाणी सर्रास सोडले जात आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. यामुळे पाण्यातील माशांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडथळा येतो, असे पर्यावरण तज्ञांचे मत आहे. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जलपर्णी काढली.  मात्र,  महा पालिका याबाबत  कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही.

दरम्यान, पवना नदीतील पाण्याचे आणि मातीचे नमुने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले आहेत. त्यानंतर संबंधितांवर कारवाई  करण्यात येईल, असे  सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी देखील  मृत मासे धरणात आढळून आले होते. त्यामुळे माशांच्या मृत्यूसाठी नेमके कारण काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात  आहे.