एचए कंपनीच्या जागेत पीएफ कार्यालय स्थलांतरीत होणार; पीएफच्या एक्झेक्युटीव्ह कमिटची मान्यता

0
901

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड येथील हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स (एच.ए) कंपनीच्या जागेत गोळीबार मैदान येथील पीएफचे झोनल ऑफीस तसेच पुणे क्षेत्रिय आणि आकुर्डी क्षेत्रिय कार्यालये देखील स्थलांतर करण्यात येणार आहे. पीएफ एक्झेक्युटीव्ह कमिटीने या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एचए कंपनीच्या प्लॉट नं. पी ६ या साडेतीन एकर जागेत पीएफ कार्यालय असेल तसेच तेथे पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टस तसेच पार्किंगची सुविधा देखील असेल.

पीएफ कार्यालयाचे झोनल ऑफीस आणि पुणे विभागाचे क्षेत्रीय कार्यालय पुणे सोलापूर रस्त्यावरील गोळीबार मैदान येथे आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जागेत हे कार्यालय आहे. तर आकुर्डी क्षेत्रीय कार्यालय आकुर्डी येथे आहे. या कार्यालयामध्ये दररोज हजारोंच्या संख्येने नागरिकांची ये-जा असते. सात ते आठ लाख रुपये भाडेत्तवावर ही कार्यालये सुरु आहेत. येथे येणाऱ्या नागरिकांची ये-जा लक्षात घेता झोनल ऑफीस तर्फेही स्वत:च्या मालकीच्या जागेसाठी प्रयत्न सुरु होते. यासाठी लेबर मिनिस्ट्री अंतर्गत कार्यरत पीएफ एक्झेक्युटीव्ह कमिटीकडे मागणी करण्यात येत होती. त्या प्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जागेचा शोध सुरु होता. पिंपरी-चिंचवड येथील एचए कंपनीने त्याच्याकडील साडेतीन एकर जागा देण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार, मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात केंद्रिय भविष्य निर्वाह निधी आयुक्त सुनिल बरतवाल यांनी एचए कंपनीच्या संबंधीत जागेवर भेट देऊन पाहणी देखील केली होती.

२० मे रोजी पीएफ एक्झेक्युटीव्ह कमिटीची दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत एचए कंपनीच्या साडेतीन एकर जागेवर मंजुरी देण्यात आली, अशी माहिती पुणे विभागाचे क्षेत्रीय आयुक्त अतुल कोतकर यांनी दिली. सेंट्रल पब्लीक वर्क डिपार्टमेंट ‘सीपीडीडब्लूडी’ ठरवून देईल त्या दराप्रमाणे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने जागा खरेदी कराण्यासही सहमती दर्शवली आहे. १९९१ पासून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जागेत पुणे विभागाचे तर आकुर्डी गावठानात २००८-२००९ या दरम्यान आकुर्डी क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज कार्यान्वित आहे. दोन्ही क्षेत्रीय कार्यालयात मिळून ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. नागरिक आणि कर्मचारी या दोघांच्या द्रुष्टीने पीएफचे कामकाज अधिक गतीमाण व्हावे या करीता एकाच जागेत पीएफची कार्यालये असावेत यासाठी पीएफच्या महाराष्ट्र झोनल ऑफीसचे अॅडीशनल कमिश्नर सत्यनारायण यांनी विशेष प्रयत्न केले. तीन्ही कार्यालये एकत्र आणण्याकरीता सत्यनारायण यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे.

पुणे विभागाचे क्षेत्रीय आयुक्त अतुल कोतकर म्हणाले, पुणे आणि आकुर्डीतील अपूरी जागा नागरिकांची वाहने पार्क करण्याची अपुरी व्यवस्था या सारख्या बाबींचा विचार केल्यानंतर पीएफ कार्यालयाचे स्वत:च्या मालकीचे कार्यालय असावे असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरीला मिळाली आहे. त्यामुळे एचए कंपनीच्या जागेत कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्स आणि वाहन पार्किंगची सुविधा तसेच पीएफच्या कामकाजासाठीची मोठी ईमारत बांधण्यात येईल दोन वर्षात काम पुर्ण करण्याचे उदीष्ट्ये देण्यात आले आहे. तेथील जागेवर एकत्रीतपणे कामकाज करणे सुलभ होईल आणि नागरिकांची सुध्दा गैरसोय होणार नाही. जागा ताब्यात आल्यावर बांधकामाचे नियोजन करण्यात येईल.