एका वर्षात ७० लाख रोजगाराची निर्मिती

0
775

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – देशातील घसरलेल्या रोजगाराच्या संख्येवरून केंद्र सरकारला घेरणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  वृत्तसमूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ठोस प्रत्युत्तर दिले. ‘रोजगाराची निश्चित आकडेवारी जाहीर करणारी यंत्रणाच नसल्याने विरोधकांच्या हाती टीकेचे अस्त्र आले आहे. पण ईपीएफओच्या आकडेवारीनुसार केवळ संघटित क्षेत्रात सप्टेंबर, २०१७ ते एप्रिल, २०१८ या काळात ४५ लाख रोजगार निर्माण झाले आहेत. हीच माहिती आधार मानली असता, रोजगार निर्मिती केवळ सन २०१७मध्येच ७० लाखांपर्यंत पोहोचते’, अशी आकडेवारीच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केली. 

लोकसभा निवडणुकीत रोजगारनिर्मितीचे प्रमुख आश्वासन दिलेल्या भाजप अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत, सध्या विरोधी पक्षांनी संसदेपासून जाहीर सभांपर्यंत मोदी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे याच मुद्द्याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी याबाबतची सरकारकडील माहिती जाहीर केली. ‘देशात नवे रोजगार किती निर्माण झाले, याची निश्चित संख्या सरकारच्या हाती नाही. स्वाभाविक यामुळेच विरोधकांना टीकेसाठी मुद्दा मिळाला आहे. रोजगारनिर्मितीबाबतचे तपशील तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी ईपीएफओ, ईएसआय, एनपीएसच्या माहितीचा आधार घेण्यात येत आहे. ईपीएफओच्या माहितीनुसार सप्टेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत देशात ४५ लाख रोजगारांची निर्मिती झाली आहे.