“एका पदासाठी ५ ते १५ लाखांची मागणी करणारे दलाली नक्की कोण? ठाकरे सरकार….”

0
257

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी रात्री याबाबत माहिती दिली. मात्र आता या सहा हजारांहून अधिक पदांसाठी दलाली सुरु झाल्याचा गंभीर आरोप राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. विद्यार्थ्यांमध्ये रोष असल्याचं सांगतानाच फडणवीस यांनी या पदांसाठी दलाली सुरु झाल्याचा गंभीर आरोप करताना एका पदासाठी पाच ते १५ लाखांची मागणी करत दलाली करणारे हे लोक कोण आहेत यासंदर्भात सरकारने तपास करावा अशी मागणी केलीय.

नवी मुंबईमध्ये या रद्द झालेल्या परीक्षेसंदर्भात पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी ज्या खासगी कंपनीमुळे ही परीक्षा रद्द करावी लागली तिच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. तसेच, “ठाकरे सरकारचं चाललंय काय? विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. वारंवार परिक्षा रद्द होतेय. आता या परीक्षेसंदर्भात स्वत: मंत्रीमोहोदयांनी फेसबुक लाइव्हच्या माध्मयातून सांगितलं की कुठल्याही पद्धतीने परीक्षा रद्द होणार नाही. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. त्यामुळे विद्यार्थी निघाले, पदरचे पैसे खर्च केले आणि विद्यार्थी आल्यानंतर आदल्या रात्री त्यांना समजतंय की परीक्षा रद्द झाली,” असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केलीय.

तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी प्रवेशपत्र देण्यातही घोळ असल्याची टीका केलीय. “या सरकारमध्ये नक्की काय चाललंय समजत नाही. परीक्षा कधी घेतात, कधी रद्द करतात. याचं कुठलंही टाइमटेबल नाहीय. कुठलंही ताळतंत्र नाहीय. आणखीन दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे ज्या पद्धतीने प्रवेशपत्र देण्यात आलेत तो सुद्धा हलगर्जीपणा आहे. कोणाला उत्तर प्रदेशातील प्रवेशपत्र तर कुणाला वेगवेगळ्या ठिकाणची प्रवेशपत्र देण्यात आलीयत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एकप्रकारचा गोंधळ निर्माण झालाय,” असं फडणवीस म्हणालेत.

“मला तर अशाही तक्रारी मिळाल्यात की काही दलाल मार्केटमध्ये आले आहेत. या पदांसाठी पाच लाख १० लाख असे पैसे गोळा करण्यासाठी काही दलाल काम करतायत. मला वाटतं की हे फार गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे. अशाप्रकारे वारंवार विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचं चाललंय ते बंद झालं पाहिजे. नाहीतर आम्ही याच्याविरोधात आम्ही आंदोलन करु,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना, “या पदांसाठी होणाऱ्या दलालीची चौकशी झाली पाहिजे. १०० टक्के या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात दलाली होत असून हे दलाल नक्की आहेत कोण हे समोर आलं पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे तक्रारी केल्यात, अनेक विद्यार्थ्यांचे त्यासंदर्भात फोन आले की पाच लाख १० लाख १५ लाख रुपये मागीतले जात आहे. तर हे लोक नेमके आहेत कोण याची चौकशी केली पाहिजे,” अशी मागणी फडणवीस यांनी केली.

आमची जबाबदारी फक्त प्रश्नपत्रिका तयार करण्याची असते असा दावा या प्रकरणामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी “कोणीही घोळ केला असला तरी कारवाई झाली पाहिजे. सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. या सरकारकरता घेतलेल्या परीक्षा आहेत. जो कोणी घोळ करत असेल त्याच्यावर कारवाई का ना! कितीवेळा घोळ करायचा?, या सरकारमध्ये रोज घोळच घोळ चाललाय तर या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का?”, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.