एअर स्ट्राइक मोहिमेत कोल्हापुरातील जवानाने केले एका विमानाचे नेतृत्व    

0
668

कोल्हापूर, दि. २७ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त केले. या  मोहिमेमध्ये एका विमानाचे नेतृत्व कोल्हापुरातील कुरूंदवाड येथील अमित कुलकर्णी  या जवानाने केले. या कामगिरीबद्दल अमितवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.  

हवाईदलाच्या ताफ्यात अमित हे सोमवारी रात्री उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून  सहभागी झाले होते. अमित यांची पत्नी अनघा यांनी गावाकडे असणाऱ्या अमित यांच्या वडिलांना ही माहिती दिली. आपल्या गावचा सुपुत्र  या मोहिमेत सहभागी होता, हे समजताच कुरूंदवाडमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला.  अमित यांच्या घरी अनेकांनी भेट देऊन अभिनंदन केले.

अमित यांचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये झाले आहे. त्यानंतर सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सातारा सैनिक शाळेत झाले आहे. खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीत उर्वरित शिक्षण पूर्ण करून २००१ मध्ये अमित  हवाई दलात दाखल झाला आहे.  अमित  पत्नी आणि मुलासह जम्मू-काश्मीर येथे वास्तव्यास आहेत.