उद्योगपती अनंत बजाज यांचे हृदयविकाराने निधन

0
1427

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे आणि बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले. ते ४१ वर्षाचे होते. आज (शनिवार) सकाळी साडे दहाच्या सुमारास मुंबईतील काळबादेवी येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनंत बजाज यांचा जन्म १८ मे १९७७ रोजी मुंबईत झाला. त्यांनी हसाराम रुजुमल कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅँड रिसर्च, मुंबई येथे पूर्ण केले. १९९९ मध्ये बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये त्यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. रांजणगाव येथे २००१ मध्ये कंपनीचा प्लांट उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. बजाज यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अनंत बजाज यांच्या मागे आई किरण, पत्नी, मुलगा आणि बहीण, असा परिवार आहे.