“उदयनराजे, एवढा त्रास झाला तर तुम्ही का सांगितलं नाही?”

0
998

मुंबई , दि.१४ (पीसीबी) – छत्रपती उदयनराजे भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला त्रास त्यांनी कधी सांगितला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उदयनराजे भोसले यांनी संसदेत चांगले काम करावे. अनेक नेत्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून पक्ष प्रवेश करुन घेतले जात आहेत, असा गंभीर आरोपही यावेळी सुप्रिया सुळेंनी भाजपवर केला आहे.

१५  वर्षात त्यांना कोणताही त्रास झाल्याचं कधीच ऐकलं नाही. ते तसं कधीच बोलले नाही. मात्र त्यांना त्रास झालाय आता ते बोलले आहेत. त्यांना शुभेच्छा. कोणत्याही पक्षात गेले तरी ते चांगलंच काम करतील, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे. प्रत्येक राज्यात भाजप वाढत आहे. अनेक लोक भाजपशी जोडले जाण्यास इच्छुक आहेत. त्यामागे हेच कारण आहे, असं उदयनराजेंनी सांगितलं आहे.