इंदापूरच्या पाण्यासाठी हर्षवर्धन पाटलांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखला

0
479

इंदापूर, दि. २० (पीसीबी) – इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी इंदापूर तालुका काँग्रेसने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आज (गुरूवार) पळसदेव येथे रास्ता रोको आंदोलन केले. पुणे-सोलापूर महामार्गावर माजी मंत्री पाटील आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला.  

तालुक्यातील सर्व पाझर तलाव कोरडे पडले आहेत. शेजारीच असलेल्या बारामती आणि दौंड तालुक्यात खडकवासला व भाटघर धरणाचे पाणी कालव्यातून मिळाले. मात्र, इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले नसल्याने पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर महामार्ग रोखण्यात आला.

निष्क्रीय आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामुळेच तालुक्यावर ही वेळ आली आहे, असा आरोप   पाटील यांनी केला. खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी सोडून तालुक्यातील २७ पाझर तलाव भरावेत, अशीही मागणी केली.

दरम्यान, मागील २० वर्षे मंत्री असलेल्या या हर्षवर्धन पाटलांनी पाण्याचा योग्य नियोजन केले असते, तर ही वेळ इंदापूरच्या जनतेवर आली नसती. कालवा सल्लागार समितीवर पाटील हेही सदस्य आहेत. त्यामुळे मी जेवढा जबाबदार आहे, तेवढे पाटील पण जबाबदार आहेत, असा पलटवार भरणे यांनी केला आहे.