आर.आर. आबा गडचिरोलीत मोटार सायकलवरून फिरायचे; मुख्यमंत्री किती वेळा गेले? – शरद पवार

0
738

मुंबई, दि. ५ (पीसीबी)  दिवंगत नेते आर.आर पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री असताना मोटार सायकलवरून महिन्याला नक्षल भागातील दौरा करत होते.  मात्र, मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस किती वेळा गडचिरोलीला जाऊन आले, असा खोचक  सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत बोलावली होती. या बैठकीत त्यांनी विविध  मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.

पवार म्हणाले की, आर.आर आबा जिवाची पर्वा न करता नक्षल भागात जात होते.  अधिकाऱ्यांची आबांना काळजी होती, पण स्वत:च्या जीवाची आबांनी कधी  पर्वा केली नाही.  त्यांनी स्वत: गडचिरोलीचे पालकमंत्री पद मागून घेतले होते.  त्या पदाला त्यांनी न्याय दिला होता, असे पवार म्हणाले.

सध्याचे गृहमंत्री किती वेळा गडचिरोलीत गेले. तेथील नक्षल भागात फिरले? तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? असे सवाल करून गृहमंत्र्यांनी खरे तर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दयावा, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.