आर. आर. आबांची कन्या स्मिता पाटील मावळमधून रिंगणात ?

0
862

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र  पार्थ पवार  निवडणूक लढवणार होते. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार पार्थला निवडणूक रिंगणात उतरविण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दिवंगत नेते आर.आर. पाटील यांची कन्या स्मिता हिला मावळमधून मैदानात उतविण्याच्या  हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्मिताशी चर्चाही केल्याचे सांगितले जात आहे.     

राष्ट्रवादी मावळमध्ये तगडा उमेदवार  देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच आधी पार्थ पवार यांचे नाव समोर आले होते.  पार्थ पवार यांनी या मावळमध्ये गाठीभेटी, कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरूवात केली होती. मात्र, एकाच घरातील तीन उमेदवार निवडणूक लढवणार म्हणून शरद पवारांनी पार्थ पवार निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून टाकले. त्यानंतर आता  स्मिता पाटील यांनी मावळमधून निवडणूक लढवण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत.

शरद पवार यांनी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्यानंतर स्मिता पाटील यांचे नाव पक्षाने मावळसाठी  समोर आणले आहे. स्मिता पाटील यांनी निवडणूक लढवण्याबाबत  पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याशी  प्राथमिक  चर्चा केली आहे. दरम्यान, स्मिता पाटील यांनी अद्याप आपला निर्णय दिलेला नाही. त्यांच्या होकाराची पक्षाला प्रतीक्षा लागून राहिली आहे.

दरम्यान, मावळ मतदारसंघात  रायगड जिल्ह्यातील पनवेलचा समावेश होतो. या परिसरात डान्स बार मोठ्या प्रमाणात आहेत. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या परिसरात त्यांच्याविषयी  मोठी  सहानुभूती आहे. त्याचबरोबर  डान्सबार बंदीच्या निर्णयाचा  स्मिता पाटील यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला होता.  तसेच  मावळ, रायगड,  पिंपरी- चिंचवड  भागात  आर. आर. पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याचाही स्मिता यांना    फायदा होऊ शकतो, असा होरा पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.