आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत विराट कोहली अव्वलस्थानी

0
681

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – टीम इंडियाचा आक्रमक कर्णधार विराट कोहलीने आणखी एका विक्रमावर आपले  नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला पिछाडीवर टाकत विराटने आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. विराटने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत २०० धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थान मिळवले.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने कारकिर्दीतील २२ वे शतक साजरे केले. त्याने या डावात १४९ धावा चेपल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने ५१ धावांची तडाखेबंद खेळी केली. या कामगिरीमुळे    कसोटीत त्याच्या खात्यावर ९३४ गुण जमा झाले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला (९२९) मागे टाकून जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले. २०११ मध्ये सचिन तेंडुलकरने जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर सात वर्षांनी कोहलीने ही कामगिरी केली आहे.