“आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्या”- महाविकास आघाडी

0
631

मुंबई, दि,२५ (पीसीबी)- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांचं सह्या असणारे पत्रं राज्यपालांकडे सोपवले असून भाजपा बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर सत्तास्थापनेसाठी आम्हाला संधी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राजभवनात पत्र सोपवण्यात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यपाल सांगतील तेव्हा आपण सर्व १६२ आमदारांची राज्यपालांसमोर परेड करण्यास तयार असल्याचे सांगितले.

“आज आम्ही राज्यपालांना विधानसभेतील १६२ आमदारांच्या सह्या असणारं पत्र राज्यापलांना दिलं आहे. संख्याबळ नव्हतं असं सांगत भाजपाने असमर्थता दर्शवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्याकडे आजही पुरेसे संख्याबळ नसल्याने बहूमत सिद्ध करु शकणारच नाही. भाजपा असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच घटकपक्षांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी,” असे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.

यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आम्ही वेळ वाढवून मागितली असतानाही आमची मागणी राज्यपालांनी फेटाळून लावली होती. लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली, तसेच लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली. संख्याबळ असते तर दिवसाढवळ्या उजळ माथ्याने शपथ घ्यायला हवी होती असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.