आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीमुळे १९ वर्षाच्या गुरख्याचे ह्दय ठणठणीत

0
563

पिंपरी, दि. १७  (पीसीबी) – भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या मदतीमुळे ह्दयाचा आजार झालेल्या अवघ्या १९ वर्षे वयाच्या एका नेपाळी गुरख्यावर मोफत ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाने त्याला तब्बल साडेचार लाखांचा खर्च सांगितला होता. परंतु, आमदार जगताप यांच्या पुढाकारातून सरकारच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत पवना हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया पार पडली.  

प्रसाद खवाल (वय १९, रा. नित्यानंद पार्क, विद्यानगर, पिंपळेगुरव, मूळ रा. नेपाळ) असे मोफत ह्दय शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नाव आहे. प्रसाद हा मूळचा नेपाळचा आहे. तो पिंपळेगुरव परिसरात गुरख्याचे काम करतो. लहान वयातच त्याला ह्दयाचा आजार जडला. त्याने विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. एका रुग्णालयातील डॉक्टरने त्याच्यावर तातडीने ह्दयशस्त्रक्रिया न केल्यास जीव गमवावा लागण्याचा धोका असल्याचे सांगितले. परंतु, त्यासाठी तब्बल साडेचार लाख रुपयांचा खर्च होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. प्रसाद हा गुरख्याचे काम करत असल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी एवढी मोठी रक्कम कोठून आणायची, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.

त्याने व त्याच्या जवळच्या मित्रांनी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे धाव घेऊन ह्दयाच्या आजाराबाबत माहिती दिली. ह्दयशस्त्रक्रियेसाठी त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. आमदार जगताप यांनी तातडीने त्यांना मदत मिळवून दिली. पवना हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून प्रसाद याला रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंती केली. तसेच त्याच्यावर उपचार करण्याची सूचना त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत त्याच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली.

त्यानुसार गुरख्याचे काम करणाऱ्या प्रसाद याच्यावर पवना हॉस्पिटलमध्ये मोफत ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसाद याने आमदार जगताप यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. दरम्यान, कोणताही गंभीर आजार असलेल्या शहरातील गोरगरीब रुग्णांनी पैशांअभावी उपचार थांबवू नयेत. विविध आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लाखोंची मदत मिळते. तसेच सरकारच्या अनेक योजनाअंतर्गत प्रत्येक आजारावर मोफत शस्त्रक्रिया करता येतात. परंतु, त्याबाबत नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे कोणताही आजार झालेल्या शहरातील रुग्णांनी आर्थिक मदत किंवा मोफत उपचारासाठी पिंपळेगुरव येथील आपल्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.