आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संजय गांधी योजनेच्या ६८ लाभार्थीना पेन्शन पत्राचे वाटप

0
904

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने ३० विधवा महिला, २० जेष्ठ नागरिक, १० अपंग, घटस्फोटित, ३ मूकबधिर, २ कर्णबधिर अशा ६८ नागरिकांना मंजुरीचे पत्र भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, हवेली संजय गांधी तहसीलदार राधिका बारटक्के, चिंचवड विधानसभा संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नगरसेविका माई ढोरे, संजय गांधी योजना अध्यक्ष गोपाळ माळेकर, संजय गांधी योजना सदस्य दिलीप गडदे, संजय मराठे, राजेंद्र पाटील, अश्विनी तापकीर, अदिती निकम, चैत्राली शिंदे, नायब तहसीलदार मुळशी मेघ देशमुख, नायब तहसीलदार हवेली विमल डोलारे, शीतल शिर्के, नगरसेविका माधवी राजापुरे, सिमा चौगुले, संतोष जगताप, अभय नरवडेकर, दीपक जाधव आदी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “भविष्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकही लाभार्थी शासनांच्या विविध योजनांपासून वंचित राहू नये याची काळजी सर्व सदस्यांनी घ्यावी. लवकरच संजय गांधी योजनेचे कार्यालय आकुर्डी तहसीलमध्ये सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्यासोबत बैठक झाली असून लवकरच आदेश निघतील, असे त्यांनी सांगितले.”

तहसीलदार राधिका बारटक्के म्हणाल्या, “आठ विधानसभा मतदारसंघापैकी चिंचवड विधानसभा समितीचे काम प्रथम क्रमांकाचे असून जे काही भविष्यात सहकार्य लागेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत.”

या कार्यक्रमात संजय मराठे व राजेंद्र पाटील यांची संजय गांधी योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना तपासणी समितीवर संतोष जगताप यांची निवड झाल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर यांनी केले.