“आमच्या लोकांवर ज्याप्रकारे हल्ले होत आहेत त्याबाबत पंतप्रधान काहीच बोलत नाही?”

0
201

मुंबई,दि.१३(पीसीबी) – बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, गाडीवरील भगव्या फलकास काळे फासण्याचाही प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. यास शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले असुन, कोल्हापुरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली आहे. सध्या सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, भाजपा व पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, “ज्या प्रकारे बेळगावमध्ये कर्नाटक भाजपाप्रणित एक संघटना आहे, ते आमच्या मराठी लोकांवर ज्याप्रकारे हल्ले करत आहेत. आमच्या शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे. भाजपाला किंवा केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार सुरू आहे, असं ते म्हणत आहेत, त्याबद्दल त्यांना खूप चिंता आहे. मात्र बेळगावमध्ये आठ दिवसांपासून आमच्या लोकांवर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहेत, खुनी खेळ सुरू आहे. त्याबाबत भाजपाचा कोणताही वरिष्ठ नेता, केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधान काहीच बोलत नाही?”

दरम्यान “तिथं आमच्या लोकांची डोकी फुटत असतील, तर आम्ही देखील हातात दंडुके घेऊन तिथं जावं का? आम्ही देखील तशाचप्रकारे उत्तर देऊ शकतो. परंतु हा देशाचा अंतर्गत मुद्दा आहे, हा भारत-पाकिस्तानाचा मुद्दा नाही. जर पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला तर हा जो भाषा वादाचा मुद्दा आहे तो शांततापूर्ण पद्धतीने संपू शकतो. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की, आपल्या लोकांना बळ देण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ बेळगावला जायला हवं.” असं देखील संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.