आबा बागूल फडणवीस यांच्या भेटीला

0
68

महाराष्ट्र, दि. १५ (पीसीबी) – राजकीय वर्तुळात सध्या नाराजीचे सत्र दिसून येत आहे. भाजपासह महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येही उमेदवारी न मिळाल्याने नाराजी दिसून येत आहे. अशात पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना तिकीट देण्यात आलंय. तर, भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान असणार आहे. शहर काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का समजला जातोय.

धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने कॉँग्रेस नेते आबा बागूल नाराज झाले आहेत. त्यांनी पुण्यातील कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर आंदोलन देखील केलं होतं. तेव्हापासून आबा बागुल भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती.आता तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा होत आहेत.
नागपुरात पोहोचल्यावर आबा बागुल यांना या संदर्भात प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, मी खासगी कामासाठी नागपुरला आलो आहे. आता जर आबा बागुल यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला तर काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना बागुलांच्या नाराजीचा किती फटका बसणार आहे? हे आगामी काळात दिसून येईलच.

बागूल कॉँग्रेसच्या अनेक बैठकांमध्येही अनुपस्थित राहिले आहेत. काही दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला आबा बागुल गैरहजर होते. उमेदवारी न दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

बागुलांच्या नाराजीचा किती फटका बसणार?
‘पुण्यात 40 वर्षे काम केलेल्या पक्षातल्या निष्ठावंतांवर अन्याय झाला. निष्ठावंतांना न्याय नसेल, तर न्याय यात्रेचा उपयोग काय’, असा सवाल आबा बागुल यांनी केला होता. त्यामुळे आबा बागुल यांची नाराजी ही उघड आहे.त्यांनी 5 वेळा कॉँग्रेसकडून नगरसेवक पद भूषविले आहे.

दरम्यान, पुण्यात वंचितकडून वसंत मोरे यांनी आव्हान दिलं आहे. त्यामुळे येथे आता तिरंगी लढत होईल. मविआकडून धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, भाजपाकडूनही मोहोळ यांचं तिकीट फिक्स आहे. आता बागूल यांनी बंडखोरी केली तर त्याचा धंगेकर यांना नेमका काय फटका बसणार?, याबाबत आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरेल.