आपसातील भांडणामुळे दोघांचंही नुकसान : मोहन भागवत

0
402

नागपुर, दि.१९ (पीसीबी)- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा व शिवसेना या दोन्ही मित्र पक्षात मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्यांवरून एकमत न झाल्याने, जनतेने कौल दिल्यानंतरही राज्यात महायुतीला सत्तास्थापन करता आलेली नाही. परिणामी सध्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या दोन्ही पक्षांना अप्रत्यक्षरित्या सुनावले असल्याचे दिसत आहे. ”आपसात भांडल्याने दोघांचंही नुकसान होतं, हे माहिती असुनही काहीजण भांडतात” असे त्यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी म्हटले आहे.

यावेळी सरसंघचालक भागवत यांनी हे देखील म्हटले की, सर्वांना माहिती आहे की स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे. मात्र, आपल्या स्वार्थाला खूप कमीजण सोडतात. देशाचे किंवा व्यक्तींचे उदाहरण घ्या. माणसाला हे देखील माहिती आहे की निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही नाश होणार आहे. मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही. सर्वांना माहिती आहे की आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते. मात्र तरीदेखील आपसातील भांडणे अद्यापही बंद झालेली नाहीत.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना प्रत्यक्षात सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही.  शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला  विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली  आहे.