आजची काँग्रेस – राष्ट्रवादीची दिल्लीतील बैठक रद्द

0
549

नवी दिल्ली,दि.१९(पीसीबी) – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम असल्याने आघाडीची आज होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही बैठक उद्या होणार असल्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी वर्तवली आहे.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून पत्रकारपरिषदेद्वारे सांगण्यात आले होते की, राज्यातील सत्तास्थापनेबद्दल निर्णय घेण्यासाठी पुढील एक ते दोन दिवसात आमचे सर्व नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. विशेष म्हणजे यावेळी शरद पवारांनी शिवसेनबरोबर सरकारस्थापनेसंदर्भात काहीच सांगितले नव्हते. तसेच, किमान समान कार्यक्रमाबाबतही काही ठरलेलंच नाही असं देखील वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. आता या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आघाडीच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. मात्र, आजची बैठक रद्द झाली असून उद्या ही बैठक होऊ शकते अशी माहिती देण्यात आलेली आहे.

तर, बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते दिल्लीत दाखल झालेले आहेत. या राष्ट्रवादीकडून अजित पवार, नवाब मलिक, सुनिल तटकरे तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, के.सी.पाडवी हे सर्व नेते दिल्लीत आहेत.