‘आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते’; ‘या’ काँग्रेस नेत्याच्या मुलीने पडळकरांना शिकवले संस्कार

0
393

मुंबई, दि.३० (पीसीबी) : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राज्यात सध्या राजकारण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. ‘राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण परत मिळवू देऊ शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेऊ’, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही अशी घोषणा केल्याची आठवण त्यांना करुन दिली. दरम्यान यावरुन गोपीचंद पडळकर यांनी टीका केली असून त्याला बाळासाहेब थोरात यांच्या लेकीने उत्तर दिलं आहे. ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की असं होतं’, असा टोला यावेळी त्यांनी पडळकरांना लगावला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना म्हंटल होत कि, “फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात. मात्र यापैकी काहीही झालेलं नाही. सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही; हा भाजपाचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात,” असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.

दरम्यान बाळासाहेबांना उत्तर देताना गोपीचंद पडळकर यांनी “महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यामुळे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्रजी फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्ष अगोदरच झालं आहे, याचंही भान यांना राहिलं नाही”, असं ट्विट करत त्यांनी सुनावलं. आता गोपीचंद पडळकर यांच्या या ट्वीटला बाळासाहेब थोरातांच्या कन्या शरयू देशमुख यांनीदेखील ट्वीट करत सणसणीत उत्तर दिल आहे. ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’, अशी जहरी टीका करत त्यांनी पडळकरांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.