आता मतदारयादीत नाव तपासणे, नाव नोंदविण्याची प्रक्रिया एका क्लिकवर !

0
1168

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. निवडणूक विभागाने मतदारयाद्यांच्या शुद्धिकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार ७१ हजार ४६१ मतदारांची नावे रद्द  करण्यात आली आहेत. यामध्ये आपले नाव रद्द् झाले नाही ना, याची खात्री मतदारांनी करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी मतदारयादीत नाव तपासणे किंवा नाव नोंदविण्याची प्रक्रिया आता एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.   

https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्याबाजुला दिलेल्या लिंकवरील इलेक्ट्रोल सर्च इंजिनवर क्लिक करा. नावानुसार आणि आयडी कार्डनुसार येथे नाव तपासता येते. नावानुसार तपासायचे असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत. विधानसभा मतदार संघानुसार नाव तपासायचे असेल, तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.

मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत आहे. मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी ऑनलाइन पर्यायही उपलब्ध आहे. www.nvsp.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरता येईल.

-www.nvsp.in या संकेतस्थळावर जा.

-अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू वोटरवर क्लिक करा.

– राज्य, जिल्हा, विधानसभा, लोकसभा मतदारसंघ यानुसार क्लिक करा.

-संपूर्ण अर्ज भरून आवश्यक ते कागदपत्रे अटॅच्ड करा.

-भरलेला अर्ज पुन्हा तपासा आणि सबमिट करा.

अर्जामध्ये संपूर्ण नोंदी कराव्यात. विधानसभा क्षेत्रानुसार आपला विधानसभा मतदारसंघ निवडावा. पत्ता अचूक टाका. कुटुंबातील किंवा शेजारच्या व्यक्तीचा मतदार ओळखपत्रांचा अचूक क्रमांक (इपिक क्रमांक) लिहावा. छायाचित्र अपलोड करताना चेहरा स्पष्ट दिसेल याची काळजी घ्या. फाइल अटॅच्ड करताना ती दोन एमबीपेक्षा जास्त नको. जेपीजी, पीएनजी, बीएमपी, जेपीईजी, डीपीआय २०० फोटो साइज १२८० बाय १०२४ सेंटीमिटर असावी. अड्रेस प्रूफ (इलेक्ट्रिक बिल, आधार कार्ड, इ.) जन्म तारखेचा दाखल्याची प्रत स्पष्ट दिसेल, अशी असावी. अर्जदाराने अर्जात अपंगत्व असल्यास उल्लेख करावा. मतदारनोंदणी अधिकारी कार्यालयात ६ नंबरचा अर्ज भरून नाव नोंदविता येईल.

दरम्यान, प्रारूप मतदारयाद्या १ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.  दावे आणि हरकती ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. डेटाबेस अद्यावतीकरण व पुरवणी यादीची छपाई  ३ जानेवारी २०१९ पर्यंत करण्यात येणार आहे.  तर अंतिम मतदारयादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.