आता धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी १ ऑगस्टपासून रणशिंग फुंकणार

0
854

पुणे, दि. ३० (पीसीबी) राज्यभरात मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनामुळे वातावरण ढवळून निघाले असताना आता धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी रणशिंग फुंकले असून लढा तीव्र करण्याचा इशारा पुण्यात आज (सोमवारी) धनगर समाजाच्या नेत्यांनी दिला. आरक्षणासंदर्भात १ ऑगस्टला पुण्यातील कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

आज येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, पुण्यात होणाऱ्या बैठकीनंतर राज्यात तीव्र लढा उभारणार आहे. तसेच १ सप्टेंबर २०१८ रोजी औरंगाबाद येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील धनगरांना अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गाचा दाखला द्यावा अन्यथा भविष्यात तीव्र लढा उभारला जाणार आहे. त्याला सरकार जबाबदार राहील, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

पडळकर पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, आदिवासी मंत्रालयाकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड आढळून आलेला नाही. तऱ धनगर समाजाला आरक्षणापासून वंचीत ठेवण्यासाठी सर्व जिल्ह्यात मिळून ९३ हजार धनगड, तर एकूण १९ लाख ५० हजार बोगस आदिवासी दाखविले आहेत. यावर आदिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे ३० टक्के अनुदान, ३० टक्के नोकऱ्या या इतर समाजाने बोगसगिरी करुन लाटल्या आहेत, त्यामुळे सर्व आदिवासी मंत्री, आमदार व बोगस लाभधारक व नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर २०१४ मध्ये मुख्यमंत्र्यावर ठाम विश्वास ठेवून सरकारला पाठिंबा दिला. परंतू, मुख्यमंत्र्यांनी टिसच्या माध्यमातून धनगरांना आरक्षण मिळूच नये, अशी भूमिका घेतली. जर मुख्यमंत्र्यांनी १ सप्टेंबरपूर्वी आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास या सरकार कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. तसेच तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा पडळकर यांनी दिला.