आता दुधाची रिकामी पिशवी परत केल्यास ५० पैसे मिळणार

0
974

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राज्यात रोज एक कोटी दूध पिशव्या रस्त्यावर पडतात. यामुळे  दूध विक्रेत्यांकडे दूध पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी रिकामी झालेली दूध पिशवी  परत करावी.  त्या रिकाम्या दूध पिशवीची ५० पैसे रक्कम रोज ग्राहकाला परत केली जाईल, अशी  एक योजना एक महिन्याच्या आत सुरू केली जाणार आहे,  अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज ( गुरुवारी) विधानसभेत दिली.   

या योजनेमुळे दिवसाला ३१ टन दूध पिशव्यांचा घनकचरा कमी होण्यास मदत होणार आहे, असे  सांगून कदम म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिवसाला २३,७०२ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्यातील १२,५४८ मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते,  त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करून शेतकऱ्यांना कमी दरात विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्रातील प्लास्टिक बंदीच्या कायद्यामुळे युनोने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. राज्यात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती केली.  विभागवार बैठका घेतल्या आढावा बैठका घेतल्या, सभा घेतल्या, अशी माहिती कदम यांनी यावेळी दिली. वापी आणि गुजरात या मार्गाने ८० टक्के प्लास्टिक महाराष्ट्रात येत होते, मी स्वतः महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर जाऊन ट्रक पकडले, गोडाऊन वर धाडी टाकल्या. १ लाख २० हजार मेट्रिक टन प्लास्टिक गोळा केले.  ९८६ मेट्रिक टन प्लास्टिक जप्त करण्यात आले.

या प्लास्टिकवर २४ कंपन्या दिवसाला ५५० मेट्रिक टन प्लास्टिक रिसायकल करण्याचे काम करत आहेत. सिमेंट कंपन्या एल अँड टी, अंबुजा सिमेंट अशा कंपन्यांना तीन हजार मेट्रिक टन प्लास्टिक देऊन त्याचा वापर सिमेंट मध्ये करण्यात यावा, अशा सूचना त्यांना  दिल्या आहेत. तसेच  रस्त्यावर वापरल्या जाणाऱ्या मरातही प्लास्टिकचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू  केली  आहे. त्यामध्ये ७ टक्के वरचा थर प्लास्टिकचा देण्याचे  आदेश केंद्र सरकारने रस्ते विकास विभागाला दिले आहेत, असेही कदम यांनी यावेळी  सभागृहात सांगितले.