‘….आणि त्या ज्योतिर्लिंगांला पाण्याने चहूबाजूंनी वेढलं’; भाविकांना दर्शनास मनाई

0
244

भीमाशंकर, दि.२३ (पीसीबी) : महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर मुख्य मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे.

गेल्या 24 तासांपासून पुणे, जुन्नर, खेड या भागांत दमदार पाऊस कोसळतोय. त्यातही भीमाशंकर परिसरात गेल्या अनेक तासांपासून दमदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. काल आणि आज भीमाशंकर परिसरात जोपदाप पाऊस पडल्याने मंदिराच्या बाजुच्या डोंगरातुन पुराचा लोट मंदिरात आला आहे. त्यामुळे मुख्य मंदिरात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय.मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळुन तेच पाणी मंदिरात आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना एन्ट्री नाहीय. मंदिरात केवळ पुजारी असतात. मंदिरात दैनंदिन पुजा-अर्चा सुरु असते. मात्र आता पाण्याच्या वेढा वाढल्याने प्रशासनाने पुजारी आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांनाही योग्य ते सूचना दिलेल्या आहेत.