‘…आणि अखेर तोतया महिला पत्रकार अडकली पोलिसांच्या ताब्यात’; परमिटरूममध्ये करायची हफ्त्याची मागणी

0
308

पुणे, दि.१८ (पीसीबी) : पत्रकार असल्याचे ओळख पत्र गळ्यात घालून आम्ही क्राईम प्रेस रिपोर्टर असल्याचे सांगून परमिट रुमचालकाकडे हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना पुण्यातील खडक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हाजलिना प्रमोद जयस्वाल (वय 35, रा. ताडीवाला रोड) आणि सतपाल सिंग अमरसिंग बग्गा (वय 57, रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका 30 वर्षाच्या परमिट रुम चालकाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचे सेवन लव चौक येथे इंप्रेस सेव्हन लव्हज नावाचे परमिट रुम आहे. त्यांच्याकडे हाजलिना जयस्वाल व सतपाल बग्गा हे शनिवारी आले होते. त्यांनी गळ्यात प्रेस सीसीटी क्राईम चेक टाईम्स नावाचे ओळखपत्र घातले होते. त्यांनी आम्ही क्राईम प्रेस रिपोर्टर असून तुम्ही अवैद्यरित्या दारुची विक्री करीत आहात. लोकांना आपल्या परमिटरुममध्ये बसवून दारु पिण्याची परवानगी देत आहात. तुमच्यावर कारवाई करणार आहे. तुमच्या मालकांना आमची टीम बोलवत आहे, असे सांगितले. त्यानंतर ते एक हजार रुपये घेऊन तेथून निघून गेले. काही वेळाने त्यांनी फोन करुन जर केस करायची नसेल तर जादा 5 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. फिर्यादी यांनी खडक पोलिसांना फोन करुन याची माहिती सांगितली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली. शनिवारी दुपारी दीड वाजता ते पैसे घेण्यासाठी आले असताना पोलिसांनी दोघांना पकडले.