आगामी निवडणुकीसाठी ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर युती करणार ?   

0
1299

नागपूर, दि. २९ (पीसीबी) – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करण्याचे संकेत  एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवेसी दिले आहेत. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघ व एमआयएम यांची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी मतभेद  असल्याने  प्रकाश आंबेडकर काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची शक्‍यता नाही. त्यासाठी दुसरा पर्याय म्हणून आंबेडकर यांनी  राज्यातील दलित,  वंचित घटकासोबत बोलणी सुरू केली आहे. तर काही दिवसांपूर्वी आंबेडकर यांनी ‘एमआयएम’सोबत निवडणुकीसाठी आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

दरम्यान, ओवेसी यांनी प्रसिद्धी पत्रक काढून  सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेवर आपला भक्कम विश्‍वास आहे. ज्या पक्षांचा डॉ.  आंबेडकर यांच्या विचारावर विश्‍वास आहे व जो पक्ष त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करतो, त्या पक्षांसोबत राजकीय आघाडी करण्यास एमआयएम नेहमीच तयार आहे,’ असे ओवेसी यांनी म्हटले  आहे.