अाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार

0
1157

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – राज्यातील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन चालू असतानाच या विषयावर आपली भूमिका निश्चित करण्यासाठी सोमवारी सत्ताधारी शिवसेनेसह दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांनी आपापल्या पक्षांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

या बैठकांनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एक संयुक्त शिष्टमंडळ संध्याकाळी राज्यपालांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांवर चर्चा करत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असलेले मुख्यमंत्र्यांनी शनिवारी विधानभवनात सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी व काही निमंत्रितांशी चर्चा केली होती. यात सर्वांनी सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र, यानंतर मराठा आंदोलनाच्या प्रश्नांवर आपल्या पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी सोमवारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्र बैठका घेण्याचे जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’वर पक्षाचे मंत्री व आमदारांची बैठक बोलावली आहे.

काँग्रेसनेही १२ वाजता विधानभवनातल्या पक्ष कार्यालयात आमदारांची बैठक बोलावली आहे. ११ वाजता राष्ट्रवादीने पक्षाच्या आमदारांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बोलावले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा जातीसंदर्भातील आर्थिक-शैक्षणिक अहवाल दिल्यानंतर महिनाभरात राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. सरकारबरोबरच विरोधी पक्षही मराठा आरक्षण प्रश्न सकारात्मक आहेत. हे सिद्ध करण्याची विरोधकांना आयती संधी चालून आली आहे. त्यातूनच उद्या सर्वपक्षीय बैठकांचे सत्र झडत आहे.