अवघ्या दहा दिवसांत शेख कुटुंबातील तब्बल पाच माणसे करोनाबळी

0
272

सोलापूर, दि. ४ (पीसीबी) : करोनाची दुसरी लाट आता हळुवारपणे ओसरत असल्याचा दिलासा मिळत असताना या दुसऱ्या लाटेत मागील तीन महिने मृत्यूचे अक्षरश: जे तांडव सुरू होते, त्यात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. यात सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीच्या शेख कुटुंबीयांवर कोसळलेला दु:खाचा डोंगर अन्य कोणाच्याही वाटय़ाला येऊ नये, असाच आहे. अवघ्या दहा दिवसांत सात माणसांच्या शेख कुटुंबातील तब्बल पाच माणसे करोनाबळी ठरली आहेत. सोलापूर—पुणे महामार्गावरील टेंभुर्णी येथील शेख कुटुंबीयांतील दोन तान्हुल्या मुली अनाथ झाल्या आहेत. या कुटुंबाचे आयुष्य आणि भविष्यच अंधकारमय बनले आहे. अवघ्या दहा दिवसांत होत्याचे नव्हते झालेले शेख कुटुंबीय व्यवस्थेचे बळी ठरले आहे.

२० एप्रिलपर्यंत शेख कुटुंबीय आनंदी आणि सुखी होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी घरचे कर्ते पुरुष हनीफ मौला शेख (वय ६८) हे करोनाबाधित झाले. त्या पाठोपाठ कुटुंबीयांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घेतली असता त्यात सारेच सात जण करोनाबाधित निघाले. त्यांच्यावर अकलूजमध्ये उपचार सुरू असताना मदतीसाठी घरातील कोणीही शिल्लक नव्हता. उपचार सुरू असताना २७ एप्रिल रोजी हनीफ शेख यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चारच दिवसांनी, १ मे रोजी पत्नी ईल्लला हनीफ शेख (वय ६१) यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर ५ मे रोजी थोरला मुलगा इक्बाल (वय ३९) आणि दुसरी पत्नी रूक्साना (वय ५५) यांच्यावरही काळाने झडप घालून हिरावून घेतले. मृत्यूचे तांडव पुन्हा सुरूच होते. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ मे रोजी हनीफ शेख यांच्या सून अर्शिया भैय्या शेख (वय २४) यांनाही मृत्यूने गाठले.

अशाप्रकारे अवघ्या दहा दिवसांत शेख कुटुंबीयांच्या घरात मृत्यूने थैमान घातले असताना दोन चिमुकल्या, तान्हुल्या मुली मात्र अनाथ झाल्या आहेत. भैय्या शेख यांच्या पत्नी अर्शिया चार महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांची १६ महिन्यांची मुलगी सारा ही आता आईविना अनाथ झाली आहे. तर भैय्या यांचे थोरले बंधू इक्बाल यांना स्वत:च्या मुलीचे तोंड पाहण्याचेही नशिबी आले नाही. त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या पत्नीने १२ मे रोजी गोंडस मुलीला जन्म दिला.

दिवंगत हनीफ शेख हे टेंभुर्णीत वाहन दुरूस्तीचा गॅरेजचा व्यवसाय करायचे. तर थोरला मुलगा इक्बाल हा भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असे. धाकटा मुलगा भैय्या हा पाणी टँकर चालवितो. सामान्य अशा शेख कुटुंबाच्या नशिबी अचानकपणे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

यासंदर्भात शेख कुटुंबातील भैय्या शेख यांनी आपली कैफियत मांडताना व्यवस्थेवरही बोट ठेवले आहे. वडील हनीफ हे मजबूत अंगकाठीचे होते. आईला हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रास होता. आई—वडिलांसह सर्वांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले तेव्हा प्रत्येकाची एचआरसीटी केली असता करोनाची केवळ प्राथमिक अवस्था होती. प्रत्येकाचा करोना स्कोअर अवघा एक ते दोन टक्का एवढाच होता. मात्र उपचारासाठी कोविड  रुग्णालयात रुग्ण खाटा मिळण्यासाठी अक्षरश: धावाधाव करावी लागली. त्यात वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले. आपण स्वत: करोनाबाधित असतानाही औषधे आणण्यासाठी पळापळ करावी लागली. वडिलांसाठी बार्शीतून रेमडेसिव्हर इंजेक्शन्स आणावे लागले. परंतु त्यातील एक इंजेक्शन वडिलांना दिल्यानंतर त्यांची प्रकृती काही वेळातच खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. कारण मिळालेले रेमडेसिव्हर इंजेक्शन हे बनावट होते, असे डॉक्टरांचा हवाला देऊन भैय्या शेख सांगत होते.