अलिबाग येथील रेवदंडा किल्ल्यावर जमिनीत गाडलेल्या तब्बल २२ तोफा उजेडात

0
765

अलिबाग, दि. २० (पीसीबी) – रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे असलेल्या रेवदंडा या प्रसिद्ध किल्ल्यावर १९ मे २०१९ रोजी दुर्ग संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आधीच्या गणनेव्यतिरिक्त नवीन २२ तोफा उजेडात आल्या आहेत. पोर्तुगीज काळातील या किल्ल्यात ३६ तोफांची नव्याने नोंद सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे. या सर्व तोफांवर क्रमांक टाकण्यात आले आहेत, जेणेकरून त्याची गणना होईल असे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

या पूर्वी संस्थेने या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आणि तोफ संवर्धन मोहिमा राबविल्या आहेत. या मोहिमेत किल्ल्यावरील जमिनित गाडलेल्या सहा तोफा संस्थेच्या सदस्यांच्या निदर्शनास आल्या होत्या, ते बाहेर काढण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाने मोहिमेचे आयोजन करून बाहेर काढण्याचे ठरले. मोहिमेस संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली तोफ संवर्धन मोहिमेस सुरवात झाली. जमिनीत गाडलेल्या जवळपास एक टनपेक्षा जास्त वजनाच्या आणि आठ ते नऊ फूट लांबीच्या सहा ते सात तोफा जमिनीतून बाहेर काढून दगडी कातड्यावर ठेवण्याचे काम करण्यात आले. प्रचंड मेहनत करून या तोफांना पाच तासानंतर ४० हुन अधिक शिवप्रेमींनी बाहेर काढले. तर एक टीम किल्ल्याच्या तटबंदी बुरुज दरवाजे यांच्यावरील झुडपे काढू लागली या दरम्यान संस्थेचे सदस्यांना तीन १४ फुट खोलीची ३.५ फुट लांबीची भुयारे सापडली ही भुयारे काही अंतरानंतर दगड मातीच्या मलब्याने बुजली आहेत. तर एक टीम तटबंदी बुरुज आणि किल्याच्या परिसरात तोफा शोधण्याचे काम करत होती.

या दरम्यान शोध मोहिमेत किल्याच्या तटबंदी बुरुज आणि जमिनीत गाडलेल्या आणि पडलेल्या जवळपास २४ तोफा या सदस्यांच्या निदर्शनास आल्या या तोफा गज लागून झाडी झुडपात, नारळा पोफळीच्या बागेत तर काही जमिनीत गाडलेल्या होत्या. या पूर्वी किल्ल्याच्या इतिहास आणि दुर्ग अवशेषांवर झालेल्या लिखाणामध्ये फक्त सात तोफांचा उल्लेख होता. आज नव्याने २२ तोफांची भर होईल. तसेच ३४ तोफा किल्ल्यात असून दोन तोफा रेवदंडा ग्रामपंचायतीकडे सिमेंटच्या चौथऱ्यावर ठेवण्यात आल्या आहेत. एकंदरीत पोर्तुगीज काळातील या किल्ल्यात ३६ तोफांची नव्याने नोंद सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे. या सर्व तोफांवर नंबर(क्रमांक) टाकण्यात आले आहेत. जेणेकरून त्याची गणना होईल. तसेच संस्थे मार्फत येत्या रविवारी ग्रामस्थांच्या सहकार्याने सूचना फलक आणि तोफा दिशा दर्शक स्थळ दर्शक लावण्याचे कामं सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागा मार्फत होईल असे अलिबाग विभाग अध्यक्ष संजय पाडेकर यांनी सांगितले.