अमित शहा आणि मोहन भागवत यांची मुंबईत भेट, राम मंदिर आणि शबरीमला मंदिर मुद्द्यावर चर्चा

0
538

मुंबई, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद आदी संघटनांनी राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारवर दबाव आणला असतानाच, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत भेट घेतली. या बैठकीत राम मंदिर आणि शबरीमला मंदिर मुद्यावर चर्चा झाल्याचे समजते. 

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यानंतर राम मंदिर मुद्यावर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर उभारणीसाठी अध्यादेश लागू करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यात राम मंदिर उभारणीसाठी सरकारने कायदा करावा, असे सरसंघचालकांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत सरसंघचालक भागवत यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. शहा आणि भागवत या दोन नेत्यांमध्ये जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत राम मंदिर आणि शबरीमला मंदिर मुद्यावर चर्चा झाल्याचे कळते.