अमित शहांना पाच वर्षापूर्वी कोण ओळखत होते का? – शरद पवार

0
629

सांगली, दि. १६ (पीसीबी) –  भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाच वर्षापूर्वी कोण ओळखत होते का? असा खोचक सवाल करून तुम्ही इतके वर्ष कोठे होता?, तुम्ही महाराष्ट्रात काय काम केले ? येथे काय दिवे लावले ते आधी सांगा, मग मला विचारा तुम्ही काय केले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहा यांच्यावर तोफ डागली.

सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहंकाळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुमनताई पाटील यांच्या प्रचारसभेत पवार बोलत होते.

पवार म्हणाले की, कुस्तीची भाषा मुख्यमंत्री बोलत आहेत. तुम्ही अशी भाषा करू नका. कुस्ती करणे हे तुमचे काम नाही. मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे.  पैलवान तयार करण्याचे काम मी करत असतो. आणि त्यामुळे कुस्ती करणे हे तुमचे काम नाही.

भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे आजपर्यंत अनेक कारखाने बंद पडले आहेत. कारखाने बंद पडल्यामुळे हजारो युवकांच्या नोकऱ्या गेल्या. हे भाजपा सरकार संकटात अडकलेल्या कारखानदारीला वाचवण्यासाठी तयार नाही. त्यामुळे बेकारी वाढली. भाजपवाले कोणासाठी  राज्य करत आहेत ? हेच कळत नाही. ही निवडणूक महत्वाची आहे. राज्याने भाजपचे राज्य पाहिले आहे. सत्तेचा वापर हा लोकांच्या भल्यासाठी करायचा असतो. याचेच विस्मरण भाजपला झाले आहे, असे पवार म्हणाले.