अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे करोनामुळे निधन

0
264

मुंबई,दि.२२(पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झालं आहे. आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कोविड न्युमोनियामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोर्चा मालिकांकडे वळविला होता. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. मात्र या सेटवर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर ५ दिवस साताऱ्यातील प्रतिक्षा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.

दरम्यान “गेले ५ दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अति दक्षता विभागात व्हेंटिलेटर वर होत्या, परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही”, अशी माहिती अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली.