अभिनंदन आज भारतात परतणार; देशाचे लक्ष वाघा बॉर्डरवर

0
510

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचे सांगितले. आज दुपारपर्यंत वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावे अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.

१४ फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला केला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. भारताने या हल्ल्याचे प्रत्युत्तर देत एअर स्ट्राइक करत पाकिस्तानच्या बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या ३०० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानने विमानांसहित भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. पण भारताने त्यांची विमाने परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले होते, मात्र त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळले होते. यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न सुरु झाले होते.