अब की बार १०० पार.. ! आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी

0
221

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर शहर भाजप आता आगामी महापालिका निवडणुकिसाठी जोमाने कामाला लागली आहे. शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘बूथ सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत प्रत्येक बूथनिहाय जबाबदारी आणि कर्तव्य निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी मार्गदर्शन केले. आगामी महापालिका निवडणुकीत ‘अब की बार १०० पार’चा निर्णया भाजपाने केला आहे, अशी माहिती संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.

‘बूथ सशक्तिकरण अभियान’ची सुरूवात आणि प्रशिक्षण बैठक भोसरी विधानसभा मतदार संघात घेण्यात आली. माजी महापौर राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, विलास मडिगेरी, संतोष लोंढे, निगडी- चिखली मंडल अध्यक्ष महादेव कवितके,सुरेश म्हेत्रे, हनुमंत लांडगे आदी उपस्थित होते.

या प्रशिक्षण बैठकीमध्ये बूथ सशक्तीकरण अभियान पीपीटी प्रेझेंटेशन करण्यात आले. तसेच, बूथमधील कार्य, सर्व समाज घटकांचा विचार करून ३० कार्यकर्त्याची यादी तयार करणे व सत्यापित करणे, बूथ समितीमधील ११ कार्यकर्त्यांचे कार्य विभाजन, मन की बात प्रमुखाची कामे, लाभार्थी संपर्क प्रमुख, कार्यक्रम प्रमुख यांच्यासह पेज प्रमुखांच्या कामाचे नियोजन करण्यात आले. तसेच, भाजपाच्या ‘सरल’ ॲपबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ‘मन की बात’ बूथ बैठक दर महिन्याला निश्चित करण्यात आली. येत्या २६ मार्च रोजी प्रत्येक बूथमध्ये आणि ३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ चा १०० वा कार्यक्रम प्रत्येक गावात भव्य आणि नाविन्यपूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निश्चित केलेल्या नियोजनाप्रमाणे ‘बूथ सशक्तीकरण अभियान’ सुरू करण्यात आले. त्याची प्रशिक्षण बैठक भोसरीत पार पडली. पक्ष संघटन आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर पक्षश्रेष्ठींनी भर दिला आहे. आगामी काळात संपूर्ण शहरात असे अभियान पक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.