अनिल अंबानींचा नॅशनल हेरॉल्डविरोधात ५ हजार कोटींचा मानहानीचा दावा

0
659

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – उद्योजक अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने राफेल सौद्याबाबत प्रसिद्ध केलेल्या लेखाप्रकरणी नॅशनल हेरॉल्डविरोधात ५ हजार  कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. नॅशनल हेरॉल्डसह रिलायन्स समूहाने गुजरात काँग्रेसचे नेते शक्तीसिंह यांच्याविरोधातही ५ हजार कोटींचा आणखी एक मानहानीचा दावा दाखल केला आहे. हे दावे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या रिलायन्स डिफेन्स, रिलायन्स इन्फ्रास्टक्चर आणि रिलायन्स एअरोस्ट्रक्चर कंपन्यांद्वारे दाखल करण्यात आले आहेत.

मानहानीचा पहिला दावा नॅशनल हेरॉल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल लि. आणि त्याचे प्रभारी संपादक जफर आगा आणि लेखाचे लेखक विश्वदीपक यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा दावा हा काँग्रेस प्रवक्ते शक्ती गोहिल यांनी अंबानी यांची कंपनी आणि राफेल विमानांच्या व्यवहारावरून केलेल्या वक्तव्यामुळे दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल व्यवहाराची घोषणा केल्यानंतर अवघ्या १० दिवसांत अनिल अंबानी यांनी रिलायन्स डिफेन्स कंपनीची सुरूवात केली होती, असे नॅशनल हेरॉल्डच्या लेखात म्हटले होते. रिलायन्सने याला अपमानजनक म्हटले आहे. रिलायन्सच्या मते, हे या लेखामुळे रिलायन्स समूह आणि समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची प्रतिमा खराब झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने अनेक काँग्रेस नेत्यांना नोटीस पाठवून राफेल सौद्यावरून रिलायन्स समूहावर आरोप करणे बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या.