अजित पवार यांच्या संस्थेची ईडी कडून चौकशी

0
229

– पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डीतील शाळेत शिक्षक भरती घोटाळा

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – आकुर्डी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिक्षणसंस्थेतील शिक्षक भरती घोटाळ्याची आता ‘ईडी’ने दखल घेतली आहे. बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे आता ईडीच्या रडावर राजकीय नेत्यानंतर शिक्षणसंस्था देखील येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

येत्या २ ऑगस्टला शिक्षक भरती घोटाळ्यात नेमक्या कोणत्या व्यक्तींचा समावेश होता, याबरोबरच अन्य प्रकरणांबाबत चौकशी होणार आहे. शिक्षक भरतीमध्ये दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याने त्यात मनी लाँडरिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती. काही शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताने ही भरती झाल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. त्यात २३ शिक्षकांची भरती बोगस झाल्याचे आढळले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. आता या शाळेतील शिक्षण भरतीतील घोटाळा ईडीच्या रडावर आला आहे.
भाजपच सरकार आल्यापासून देशात ईडीचा गैरवापर केंद्र सरकारकडून केला जात आहे. असा आरोप सातत्याने केला जातो. दरम्यान, ईडीने टाकलेल्या छाप्यांचा तपशील राज्यसभेत दाखल करण्यात आली. 2004-2014 च्या तुलनेत 2014-2022 दरम्यान ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये जवळपास 27 पट वाढ झाली आहे. अशी माहिती या तपशीलामध्ये देण्यात आली आहे.