अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचा राजीनामा

0
629

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.

सध्या विकासापेक्षा कुरघोडीचे राजकारण वाढले आहे, असा आरोप करत  जावेद शेख यांनी आपला  राजीनामा  शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे दिला आहे. तसेच हा राजीनामा महापालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे सुपूर्द करावा, असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाने गेली १५ वर्ष संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभारही मानले आहेत.

सध्याची राजकारणाची खालावलेली पातळी, सुडाचे राजकारण, विकासापेक्षा विरोधकांवर व्यक्तिगत कुरघोडी, सत्ताधाऱ्यांकडून ज्येष्ठ विरोधकांना कमी लेखणे, हे सारे पाहून राजकारणाचा कंटाळा आला आहे. त्यामुळे राजकीय संन्यास घेऊन सर्वसामान्य जीवन जगण्याचा विचार आला आहे. आमचे नेते अजितदादा यांनी अशाच कारणास्तव राजीनामा दिल्याचे समजते. त्यामुळे आमचे मार्गदर्शक जिथे नाही तिथे आम्ही का थांबायचे ? त्यामुळेच मी नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे शेख यांनी पत्रात म्हटले आहे.