अजित पवारांकडून प्रवीण दरेकर चितपट; हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर राष्ट्रवादी- काँग्रेसचे वर्चस्व

0
664

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार आणि मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना चितपट करत २१ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला. भाजपला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले.

राज्यातील सहकारी संस्थांवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या  दरेकर यांना या निकालामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरेकर यांनी राज्य सहकार संघाच्या निवडणुकीत बाजी मारली. मात्र, हाऊसिंग फायनान्सवर झेंडा फडकवण्याचा दरेकरांचा मनसुबा अजित पवार यांच्या प्रगती पॅनेलने धुळीस मिळवला.   दरेकरांच्या सहकार पॅनेलला दारूण पराभव स्वीकारावा लागला.

या संस्थेच्या संचालक मंडळात आमदार माधनराव सानप (भाजप, नाशिक विभाग)), आमदार सतिश पाटील (राष्ट्रवादी, नाशिक विभाग), माजी आमदार वसंत गिते (भाजप, नाशिक विभाग) जयश्री मदन पाटील (सांगली) या नेत्यांची वर्णी लागली आहे. या संस्थेचे राज्यात १ हजार ७०० मतदार आहेत.

या संस्थेच्या संचालकपदासाठी १ जुलै रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत २१ पैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. संस्थेचे मावळते अध्यक्ष रवींद्र गायगोले (अमरावती) आणि उपाध्यक्ष योगेश पारवेकर (यवतमाळ) यांनी भाजपच्या पॅनेलमधून निवडणूक लढवली. मात्र, दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.